परवा असाच प्रवास करताना एके ठिकाणी गाडी थांबली आणि लोक पाय मोकळे करण्यासाठी गाडीतून खाली उतरली. तिथे खूप सारी रूईची (Calotropis Procera) झाडे होती. आमच्या गावाकडे या झाडाला "रूचकीचे झाड" या नावाने संबोधले जाते, काहीजणांनी प्रश्न विचारले की हे कशाचे झाड आहे, मी त्यांना सांगितलं की ह्याला रूचकीचे झाड म्हणतात. त्यांच्या काही लक्षात आले नसावे पण ह्या झाडाला पाहिलं की आम्हाला आमचे बालपण आठवतं, कारण पायात काटा रुतला की ह्या पानाचे दूध लावून तो काटा सहजतेने पायातून काढला जायचा. ह्या झाडाचे खूप काही आयुर्वेदिक गुणधर्म सांगितले जातात.




मी त्या प्रवाश्याला प्रश्न विचारला की, तुला कधी काटा नाही का रुतला? त्यावर तो म्हणाला "नाही!" मला खूप आश्चर्य वाटलं कारण आम्ही लहान असताना रोज एक- दोन काटे तरी घरी घेऊन यायचो:) तो काटा काढण्याच्या आधी आईचा मार खावा लागायचा आणि मग तो काटा काढण्यासाठी रूचकीच्या पाणाचे दूध त्यावर टाकून मग तो काटा पायातून काढला जायचा. जगभरात "Safety Pin" म्हणून ओळख असलेली वस्तू आमच्या लहानपणी आणि अजून सुद्धा आम्ही "काटा पिन" ह्या नावाने ओळखतो!

मैदानी खेळ जसे क्रिकेट, खो-खो, विटी दांडू, गोट्या, असे बरेच खेळ आम्ही खेळायचो. आम्ही राहायचो त्या भागात खूप बाभळीची आणि अजून खूप सारी झाडी होती, संपूर्ण परिसर निसर्गरम्य होता त्यात झुळझुळ वाहणारा ओढा, खूप साऱ्या विहिरी आणि आजूबाजूला असलेली शेती असे प्रसन्न वातावरणात आम्ही राहायचो, हे सर्व आठवून खूप आनंद होतो पण दुःख या गोष्टीचं होत की आजच्या दिवशी ह्यापैकी काहीही तिथे नाहीये. या निसर्गरम्य परिसरामध्ये आता लोकांची घरे मोठ्या इमारती उभी राहत आहेत!

आजकालच्या लहान मुलांना तर हे सर्व माहीत आहे का नाही ह्यात देखील शंका आहे, मैदानी खेळांची जागा व्हिडिओ गेम, मोबाईल आणि कॉम्प्युटर गेम नी घेतली. एका वर्तमानपत्रात एक ग्राफिटी पहिली होती त्यात दोन चित्रे होती, त्यातील पहिल्या चित्रात 90s च्या दशकातील आई तिच्या लहान मुलाला ओढत घरात आणताना म्हणते "खूप झालं खेळणं, चल घरात आणि अभ्यास कर!" आणि त्याविरुद्ध दुसऱ्या चित्रात लहान मुलगा हातात मोबाईल घेतलेला आणि त्याची आई त्याला ओढत घराबाहेर आणून म्हणते की "मोबाईलमध्ये क्रिकेट खेळू नको, मैदानात जा!"

कालांतराने माणसाच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात आणि बदल हा गरजेचा असतो पण काही गोष्टी ह्या न बदलल्या तरच बरं असं खूप वेळा वाटतं. डिजिटल वस्तूंचा वापर योग्यरीत्या केला तर त्याचा फायदा होतो नाहीतर खूपवेळा नुकसानही होतं, म्हणून आपण काही गोष्टी शिस्तबध्द पध्दतीने वापरल्या पाहिजेत, मोबाईल गेमच्या ऐवजी मैदानी खेळ खेळले पाहिजेत आणि शारीरिक हालचाली करून स्वतःला स्वस्थ ठेवले पाहिजे.

Stay Healthy, Stay Safe!