सर्वत्र "Orange City" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरला महाराष्ट्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, नागपूर हे मुंबई व पुण्यानंतर महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे शहर आहे आणि दिवसेंदिवस विकसित होत आहे. नागपूर मध्ये खूप सारे प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळं आहेत, त्यापैकीच एक म्हणजे 'फुटाळा तलाव'. नागपूरमधील हे ठिकाण पर्यटकांना वेगवेगळ्या कारणासाठी आकर्षित करते त्यात मुख्यत्वे रंगबिरंगी कारंजी, हॅलोजन लाईटस्, कॅरेज राईड्स, इत्यादी. लहान मुले व कुटुंबातील सर्वांना आवडेल असे निसर्गरम्य ठिकाणाला 'फुटाळा फाऊंटन' या नावानेही ओळखले जाते.
ऑफिसला सुट्टी असल्यामुळे फिरायला जायचा प्लान आम्ही मित्रमंडळींनी बनवला पण नागपूरमध्ये दुपारी बाहेर पडणे आणि तेही ह्या उन्हाळ्यामध्ये हे खूप कठीण काम आहे! त्यामुळे आम्ही सायंकाळी बाहेर पडलो आणि ठिकाण निवडलं फुटाळा तलाव! निसर्गरम्य वातावरण, दूरवर पसरलेला तलाव आणि संगीताच्या तालावर नाचणारी मनमोहक कारंजी अशी पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी आम्ही 8 वाजताच्या सुमारास पोहचलो. रंगबिरंगी रोषणाई असलेले हे ठिकाण खूपच आकर्षित दिसत होतं, रंगबिरंगी कारंजाव्यतिरिक्त तिथे असलेले भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर हे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे.
सर्वप्रथम आपण फुटाळा तळवाविषयी थोडी माहिती जाणून घेऊया, फुटाळा तलाव हा साठ एकराच्या परिसरात पसरलेला असून तलावाला दोनशे वर्षांहून अधिक काळचा इतिहास आहे, असे म्हटले जाते की नागपूरच्या भोसले घरण्यामार्फत या तलावाची बांधणी झाली. खूप वर्ष दुर्लक्षित राहून अखेर 2003 साली NIT फंडातून त्याचे सुशोभीकरण करण्यात आले, त्यानंतर पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे भेट देत आहेत. तलाव तीन बाजूंनी खूप झाडी आहेत आणि एका बाजूने पर्यटकांसाठी बसण्याची सोय आणि सुशोभीकरण केलेले आहे.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे वायुसेनेचे हेलिकॉप्टर हे पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे, हे हेलिकॉप्टर आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. वायुसेनेत 45 हून अधिक काळ कार्यरत असताना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम, माझी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी, पी.व्ही. नरसिंह राव अशा अनेक मंडळीच्या उड्डाणासाठी वापरण्यात येणारे एमआय-8 च्या ताफ्यातील एक हेलिकॉप्टर या तलावाची शोभा वाढवण्यासाठी येथे स्थापन करण्यात आले आहे. तत्कालीन सोव्हिएत युनियनमध्ये तयार करण्यात आलेले हे हेलिकॉप्टर जगातील सर्वाधिक उत्पादित हेलिकॉप्टरपैकी एक असून, 50 हून अधिक देश याचा वापर करत आहेत.
एकंदरीत तुम्हाला या निसर्गरम्य तलावाबद्दल अंदाज आलाच असेल, येथे येऊन आम्हाला खूप छान वाटले आणि आपणही या ठिकाणाला अवश्य भेट द्या, हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांशी व नातेवाईकांशी शेअर करा, आणि काही अभिप्राय असतील तर नक्की सांगा, धन्यवाद!
0 Comments