मोबाईल शाप की वरदान यावर खूप चर्चा आपणाला ऐकायला पाहायला मिळते आणि खूप असे विचार दोन्ही पक्षाकडून ठोस पणे मांडले जातात पण आजपर्यंत त्यावर तोडगा काही निघाला नाही! तसं पाहायला गेलं तर मोबाईल हे मानवी जीवनाला खूप उपयुक्त असलेलं तंत्रज्ञान आहे जे आपण रोजच्या जीवनाचे वापरतो. आताच्या पिढीसाठी हे काही नवीन नाही कारण आजकाल बाळ जन्माला आलं की त्याचा मोबाईलशी अगदी सहज संपर्क येतो पण आपल्यापैकी खूप जणांना लहानपणापासून मोबाईल म्हणलं की खूप कुतूहल वाटायचं, गुपचूप पप्पांच्या नोकिया मोबाईल वर स्नेकचा खेळ खेळण्यात काही वेगळीच मजा होती. मोबाईल फोनचा वापर कामानिमित्त किंवा नातेवाईकांसोबत बोलणे एवढंच काय ते होत होता, कारण फोनवर कोणाशी बोलणे हेच खूप मोठी गोष्ट होती. आता मोबाईल मध्ये असं काय नाही ते सांगा! फोनवर बोलणे फक्त आता एक किरकोळ गोष्ट होऊन गेली आहे, याव्यतिरिक्त नाना प्रकारचे वैशिष्ठ्य ह्या मोबाईलमध्ये आपणास मिळू लागले आहेत.

मोबाईल ऑक्सिजन सारखा झालाय, एक वेळ जेवण उशिरा दिलं तर चालेल पण मोबाईल थोडा वेळ दूर ठेवणे कठीण झाले आहे. एकदा असाच घरात मोबाईल वापरत असताना आई म्हणते की मोबाईल हे एक बाळ झालंय, दिवसभर त्याला घेऊन फिरा आणि झोपताणापण सोबत घेऊन झोपा! हा एक विनोदाचा भाग पण सध्याचे आधुनिक तंत्रज्ञान पूर्णपणे मोबाईल मध्ये समाविष्ट झाले आहे हे म्हणणे काही चुकीचे नाही, इंटरनेटने तर मोबाईलला एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवले आहे. मोबाईल मुले टेलिफोन नाहीसे झाले, तसेच अनेक असे पारंपरिक उपकरणे जे रोजच्या जीवनात वापरत यायचे ते पण आजकाल कुठे दिसत नाहीत!

या बदलत्या काळात जे जलद आहे त्यालाच महत्त्व आहे, जो काळाप्रमाणे बदलणार नाही तो या शर्यतीत मागेच राहील. डोळ्याला न दिसणाऱ्या या इंटरनेट स्पेक्ट्रम साठी ह्या मोबाईल कंपन्या कोटी कोटी रुपये खर्च करून नवनवीन तंत्रज्ञान जगासमोर आणतात यावर खूप जणांनी आक्षेप दर्शवला पण गंमत अशी की हा आक्षेप त्यांनी दर्शवला तो ह्याच इंटरनेटचा वापर करून! कारण आजकाल कोण पेपर तरी वाचत हो आधीसारखं, मग आपले मत मांडणार कशे? ह्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे निसर्गावर खूप वाईट परिणाम होत आहेत, पण माणूस काही थांबायला तयार नाही, एकीकडे निसर्गासाठी तळमळ करायची आणि एकीकडे नवीन नवीन गोष्टींची मागणी करायची! हेच चालत आलय आणि हेच पुढेही चालू राहील.

पेपर पेन ची जागा आता स्कॅनर आणि प्रिंटर नी घेतली, शाळेच्या आणि ऑफिसच्या नोटीस बोर्डची जागा व्हॉट्सॲप ग्रुप ने घेतली. शाळेत असताना एखाद्या सुट्टीची नोटीस वाचायला चालू असलेल्या न समजणाऱ्या गणिताचा तास कधी संपतो ह्याची वाट बघण्याचा अनुभव आजच्या पिढीला कधीच मिळणार नाही. आता शाळेत जाणाऱ्या मुलांकडे पण मोबाईल आहेत, सरांच्या आधी सर्व गोष्टी मुलांना माहीत असतात कारण सरांपेक्षा जास्त ह्या मुलांना माहीत आहे मोबाईल मधलं! 

आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत असतात पण त्या काही आमलात येत नाहीत, प्रत्येक वेळेस अशी एखादी बातमी किंवा एखादा लेख वाचला की वाटत की थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेऊन आजूबाजूला काय चालू आहे ते पहावे, एखाद्या मित्राला भेटावे पण दुसऱ्याच क्षणाला मोबाईलची रिंग वाजते आणि एखादा तास त्यात कसा निघून जातो हे कळत सुद्धा नाही, ही सत्य परिस्थिती आहे, हो हे माझ्या सोबत पण खूप वेळेस होत. 

अशा खूप गोष्टी आहेत ज्या बद्दल विचार करणे आवश्यक आहे, थोडा वेळ काढून आपल्या आजूबाजूला काय चालू आहे त्याचा पण आढावा घेणे गरजेचे आहे, शेजारी राहणाऱ्या मित्राला फोनवर बोलण्यापेक्षा त्याला समोरासमोर बोलण्याची गरज आहे तरच आपण तंत्रज्ञान आणि आपल आयुष्य यामध्ये समतोल राखू शकतो.

आपण माझ्या विचारांशी सहमत असाल तर आपल्या मित्रांशी व नातेवाईकांशी हा लेख शेअर करा, व काही अभिप्राय असतील तर नक्की सांगा, धन्यवाद!